मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये विविध सामाजिक उपक्रम
– श्रीराम मंदिरात महाआरती
– रक्तदान शिबिरात १७४ जणांचे रक्तदान
कागल : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस कागल शहरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीचे औचित्य साधत येथील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.
वाढदिवसानिमित्त गैबी चौक येथे गहीनाथ गैबी पीर यांचे दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गैबी चौक ते श्रीराम मंदिर असा कार्यकर्त्यांचे रॅलीने प्रस्थान झाले. यानंतर श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली .
शाहू नगर वाचनालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समर्थ कन्स्ट्रक्शन यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १७४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. तसेच जयसिंगराव तलाव परिसरातील ‘द हार्ट गार्डन’ येथे सुमारे १२०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याशिवाय कागल नगर परिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, नगराध्यक्षा सविता माने, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, सुशांत कालेकर, संजय चितारी , सुनील माळी , सौरभ पाटील, सनी जकाते, इरफान मुजावर, यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने शहरातील शाळा व मंदिरांना पाण्याचे जार वितरित करण्यात आले तसेच शाळांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या वतीने राम मंदिर परिसरात उसाच्या रसाचे मोफत वाटप करण्यात आले. सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाय. डी. माने बाल वसतिगृहातील मुलांना केक व फळांचे वाटप केले. तसेच कार्यकर्त्यांकडून स्वर्गीय गणपतराव गाताडे मतीमंद निवासी शाळेतील मुलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांमुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस कागलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
